Bhimashankar

[atlasvoice]

भीमाशंकर

भीमाशंकर हे महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या स्थळाला हिंदू धर्मातील विशेष श्रद्धास्थान मानले जाते. तसेच, भीमाशंकरला समृद्ध जैवविविधता आणि निसर्गसौंदर्यासाठीही ओळखले जाते.

हे मंदिर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घनदाट जंगलाच्या सान्निध्यात स्थित आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी आध्यात्मिक शांतता आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम अनुभवता येतो. मंदिराचा प्राचीन नागर शैलीतील वास्तुशिल्पीय नमुना, त्याभोवती पसरलेले घनदाट जंगल, तसेच परिसरातील विविध नदी, धबधबे आणि वन्यजीव संपत्ती पर्यटकांना मोहून टाकते. भीमाशंकरच्या जंगलाला “अभयारण्य” म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे भारतीय विशाल खवल्यांची खार (Giant Squirrel) यासारख्या दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आढळतात. निसर्गप्रेमींसाठी येथे ट्रेकिंग, जंगल सफारी आणि फोटोग्राफीची उत्तम संधी उपलब्ध आहेत.

सह्याद्री पर्वताच्या उंच शिखरावरून दिसणारे सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त, तसेच पावसाळ्यात हिरव्यागार धबधब्यांचे मनोहारी दृश्य भीमाशंकरच्या पर्यटन आकर्षणात भर घालतात. त्यामुळे धार्मिक, निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी भीमाशंकर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.

ऐतिहासिक महत्त्व

भीमाशंकर मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. मंदिराच्या स्थापनेबाबत विविध आख्यायिका प्रचलित आहेत. असे मानले जाते की १८ व्या शतकात मराठा सरदार नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या परिसरात मोठी घंटा आहे, जी चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर अर्पण केली होती. या घंटेवर १७२९ हे वर्ष कोरलेले आहे. मंदिराची वास्तुकला नागरा शैलीत असून, त्यातील कोरीवकाम आणि शिल्पकला विशेष उल्लेखनीय आहे.

जैवविविधता

भीमाशंकर परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे असलेल्या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. या भागात सापडणारी ‘शेकरू’ किंवा भारतीय विशाल खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. जंगलामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी आणि कीटक आढळतात, ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे.

भीमाशंकर जवळील पर्यटन स्थळे

भीमाशंकर मंदिराच्या परिसरात निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. हे केवळ धार्मिक स्थळ नसून साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठीही एक अद्वितीय ठिकाण आहे. मंदिराच्या जवळ अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. जी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात.

  • गुप्त भीमाशंकर
    मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर, दाट जंगलात गुप्त भीमाशंकर नावाचे ठिकाण आहे. येथे भीमा नदी पुन्हा प्रकट होते म्हणूनच या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर असे नाव पडले आहे. पावसाळ्यात हा भाग आणखी सुंदर दिसतो, जिथे धुक्याने आच्छादलेला वाहत्या पाण्याचा प्रवाह निसर्गाचा अद्भुत चमत्कार भासतो. जंगलाच्या नीरव शांततेत हे ठिकाण ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी आणि निसर्गाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श ठिकाण आहे.
  • कोकण कडा
    कोकण कडा हे भीमाशंकरचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. सुमारे ११०० मीटर उंच असलेल्या या कड्यावरून सह्याद्री पर्वतरांगांचा भव्य नजारा दिसतो. स्वच्छ हवामान असेल, तर इथून दूरवर कोकणातील समुद्रसुद्धा पाहायला मिळतो. हा कडा गिर्यारोहक आणि छायाचित्रकारांसाठी स्वर्गच ठरतो. कोकण कड्याच्या मार्गावरच सीतारामबाबांचा आश्रम आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे ठिकाण उत्तम आहे. येथे साधू-संतांचा वावर असतो आणि साधना करणाऱ्यांसाठी ही जागा विशेष महत्त्वाची मानली जाते.
  • नागफणी शिखर
    ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले नागफणी शिखर समुद्रसपाटीपासून तब्बल मीटर उंचीवर आहे. नागफणी या नावाचा अर्थ ‘नागाच्या फण्यासारखे” आणि या शिखराचे स्वरूपही तसेच आहे. येथून संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. निरभ्र आकाश असल्यास पुणे आणि रायगड जिल्ह्यांचा काही भागसुद्धा दिसतो. या शिखरावर पोहोचण्यासाठी जंगलातून ट्रेक करावा लागतो, त्यामुळे साहसप्रेमींसाठी ही एक रोमांचक मोहीम ठरते.
  • भीमाशंकर अभयारण्य
    भीमाशंकर अभयारण्य हे जैवविविधतेने समृद्ध असून, निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे अभयारण्य भारतीय शेकरू (जायंट स्क्विरल) या दुर्मिळ प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे असंख्य प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सर्प आणि इतर वन्यजीव पाहायला मिळतात. संपूर्ण जंगल व्यापलेल्या हिरव्यागार वृक्षांच्या छायेतून फिरताना जंगलातील निसर्गसंपत्तीचा अनुभव वेगळ्याच जगात घेऊन जातो.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

भीमाशंकरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यांत हवामान थंड आणि आल्हाददायक असते, त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर होते. या हंगामात तापमान संतुलित राहते, ज्यामुळे जंगल सफारी, ट्रेकिंग, आणि अन्य साहसी उपक्रमांसाठी योग्य वातावरण असते.

पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) येथे मुसळधार पाऊस पडतो, परिणामी संपूर्ण परिसर हिरवाईने नटतो आणि धबधबे प्रवाहित होतात. याच काळात भीमाशंकरच्या जंगलातील जैवविविधता पाहायला मिळते. मात्र, या काळात रस्ते निसरडे होतात आणि धुक्यामुळे अंधुक दिसते त्यामुळे प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा हंगाम एक अनोखा अनुभव देतो पण योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षिततेची साधने आवश्यक असतात.

उन्हाळ्यात (मार्च ते मे) तापमान तुलनेने जास्त असले तरी, घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशामुळे येथे हवामान काहीसे सुखद राहते. उन्हाळ्यात गर्दी तुलनेने कमी असते, त्यामुळे शांतता अनुभवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हा काळ योग्य असतो.

भीमाशंकरला भेट देताना हवेच्या परिस्थितीनुसार तयारी करणे आवश्यक आहे. योग्य कपडे, बूट, आणि आवश्यक खाद्यपदार्थ सोबत बाळगल्यास प्रवास अधिक आनंददायक होतो.

भीमाशंकरला कसे पोहोचाल?

भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थान बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे भाविकांसाठी पवित्र आहे, तसेच ट्रेकिंगप्रेमींसाठीही हे एक आदर्श ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी विविध वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे योग्य पर्याय निवडू शकतात.

भीमाशंकर पुण्यापासून १२५ किमी अंतरावर आहे आणि मुंबईहूनही येथे सहज पोहोचता येते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेस पुणे आणि मुंबईहून नियमित धावत असतात. तसेच, खासगी वाहने आणि टॅक्सीनेही भीमाशंकर गाठता येते. मात्र, रस्ता डोंगराळ आणि वळणावळणाचा असल्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात, त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी वेग मर्यादित ठेवावा आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे प्रमुख स्थानक आहे. पुणे हे देशातील प्रमुख शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले असल्यामुळे कोणत्याही मोठ्या शहरातून येथे सहज पोहोचता येते. पुण्याहून भीमाशंकरपर्यंत पुढील प्रवासासाठी बस, टॅक्सी किंवा खासगी वाहन सहज उपलब्ध असते.

भीमाशंकरसाठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (PNQ) आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी पुणे विमानतळावर उतरून तेथून टॅक्सी, बस किंवा खासगी वाहनाने पुढील प्रवास करावा.

भीमाशंकर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, पर्यावरणप्रेमींनाही आकर्षित करणारे ठिकाण आहे. योग्य नियोजन करून प्रवास केल्यास तुमची भीमाशंकर यात्रा अधिक सुखद आणि आनंददायी होऊ शकते!

सावधगिरी आणि सूचना

भीमाशंकर परिसरात काही धर्मशाळा,आश्रम आणि लहान हॉटेल्स उपलब्ध आहेत. धार्मिक स्थळ असल्यामुळे येथे आल्हाददायक आणि शांत वातावरण असते. गर्दीच्या मोसमात विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भक्तगण येत असल्याने आगाऊ बुकिंग करणे उचित ठरेल. काही हॉटेल्स आणि लॉजेस ट्रेकर्ससाठीही सोयीस्कर आहेत.

मंदिर परिसरात काही लहान भोजनालये आहेत, जिथे साधे आणि शाकाहारी जेवण मिळते. येथे पिठलं-भाकरी, वरण-भात यांसारखे स्थानिक पारंपरिक पदार्थ चाखता येतात. मोठ्या हॉटेल्सची संख्या मर्यादित असल्याने, विशेषतः लहान मुलांसोबत प्रवास करताना, आवश्यकतेनुसार बिस्किटे, सुका खाऊ आणि पाणी सोबत बाळगणे फायदेशीर ठरते.

भीमाशंकर मंदिरात प्रवेश करताना पारंपरिक आणि शालीन वस्त्र परिधान करावीत. धार्मिक स्थळ असल्याने प्रथेप्रमाणे विनम्र पोशाख घालणे श्रेयस्कर असते.

भीमाशंकर हा घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशात वसलेला आहे. येथे ट्रेकिंग करताना योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षा साधनांचा वापर करावा. तसेच, वन्यजीव संरक्षित क्षेत्र असल्याने जंगलात जाताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

भीमाशंकर जैवविविधतेने समृद्ध क्षेत्र आहे. निसर्गाच्या सौंदर्याची जपणूक करण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि अन्य कचरा योग्य प्रकारे टाकावा. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी.

भीमाशंकरlला का भेट द्यावी?

भीमाशंकर हे धार्मिक,नैसर्गिक आणि साहसी पर्यटनासाठी आदर्श ठिकाण आहे. भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन, घनदाट जंगलातील जैवविविधतेचा अनुभव आणि डोंगराळ प्रदेशातील ट्रेकिंग यामुळे येथे भेट देणे अविस्मरणीय ठरते. शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात मनःशांती मिळवण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी हे ठिकाण नक्कीच एकदा पाहण्यासारखे आहे.

निसर्गप्रेमींसाठी येथील निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि घनदाट जंगल अनोखा अनुभव देतात, तर धार्मिक भाविकांसाठी हे स्थळ भक्तिभावाने ओथंबलेले आहे. त्यामुळे भीमाशंकरला एकदा तरी भेट द्यावी आणि या ठिकाणाच्या अद्वितीय सौंदर्याचा अनुभव घ्यावा!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

Ideal Duration

Best Time

Planning a Trip?

http://mahabooking.com/

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

How to Reach

By Air

Pune – 50 km

By Train

Karjat – 168 km

By Road

Pune – 123 km
Scroll to Top