माथेरान

[atlasvoice]

माथेरान

माथेरान – महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि सुंदर हिल स्टेशन! घनदाट हिरवाई, शांत वातावरण आणि प्रदूषणमुक्त हवा यामुळे हे ठिकाण खास आहे. पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत, समुद्रसपाटीपासून सुमारे २,६२५ फूट उंचीवर वसलेले माथेरान निसर्गप्रेमी, साहसशौकिन आणि मनःशांती शोधणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. मात्र, माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे पर्यटकांना आपली गाडी दस्तुरी नाका येथे पार्क करून पुढील प्रवास घोड्यावर, हातरिक्षाने किंवा पायी करावा लागतो. शहराच्या गडबडीतून काही क्षण विरंगुळा घ्यायचा असेल, तर माथेरानपेक्षा सुंदर पर्याय नाही!

इतिहास

माथेरानचा इतिहास १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत जातो. १८५० साली ब्रिटिश अधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांनी या निसर्गरम्य ठिकाणाचा शोध लावला. नंतर ब्रिटिशांनी उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळवण्यासाठी येथे उन्हाळी विश्रांतीस्थळ विकसित केले. आजही माथेरानमध्ये जुन्या काळातील वाडे आणि ब्रिटिश शैलीतील सुंदर वास्तुकला दिसून येते. ब्रिटिश काळात तयार केलेली माथेरान हिल ट्रेन (टॉय ट्रेन), जी आता युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ही येथील एक प्रमुख आकर्षण आहे. टॉय ट्रेनमधून सफर करताना मनमोहक निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव अद्वितीय असतो!

जैवविविधता

माथेरान हे पश्चिम घाटाचा भाग असून जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अस्तित्व आहे. इथल्या सदाहरित जंगलांमध्ये औषधी वनस्पती आणि दुर्मिळ पक्षीही पाहायला मिळतात, जसे की मलबार व्हिसलिंग थ्रश आणि नीलगिरी वूड पिजन! इथल्या दाट जंगलांमध्ये बिबटे, भेकड हरीण (बार्किंग डिअर) आणि विशाल खारीसारखे प्राणीही आढळतात. माथेरानच्या जैवविविधतेचा हा खजिना वन्यजीव प्रेमी आणि वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी एक नंदनवनच आहे!

माथेरान जवळील पर्यटन स्थळे

  • शार्लट लेक
    शार्लट लेक हे माथेरानसाठी मुख्य पाणीपुरवठा करणारे शांत आणि नयनरम्य ठिकाण आहे. दाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण सहलीसाठी, विश्रांतीसाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आहे. पावसाळ्यात हा तलाव भरून वाहतो आणि एका टोकाला लहानसा धबधबा तयार होतो, जो अत्यंत मोहक दिसतो. तलावाजवळच पिसरनाथ मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे.
  • लुईसा पॉईंट
    माथेरानमधील सर्वात प्रसिद्ध पॉईंटपैकी एक, लुईसा पॉईंट येथून प्रबळगड, विशालगड आणि खोल दऱ्यांचे दृष्य दिसते. सोनेरी किरणांनी आकाश रंगलेल्यामुळे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी इथले नजारे जादूई वाटतात. छायाचित्रण, ट्रेकिंग आणि पश्चिम घाटाच्या सौंदर्यात हरवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
  • पॅनोरामा पॉईंट
    याला सूर्योदय पॉईंट असेही म्हणतात, कारण इथून सह्याद्री पर्वतरांगांमधून उगवणारा सूर्य पाहण्याचा अनुभव अद्वितीय असतो. इतर पॉईंट्सपेक्षा वेगळा असा ३६० अंशाचा विस्तृत नजारा (पॅनोरॅमिक व्ह्यू) इथे पाहायला मिळतो. इथून डोंगर, दऱ्या आणि लांब पसरलेली गावे स्पष्ट दिसतात. थंड वारा आणि आल्हाददायक वातावरणामुळे ध्यानधारणा, छायाचित्रण आणि ट्रेकिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
  • इको पॉईंट
    नावाप्रमाणेच, इथे आवाज दिल्यास त्याचा प्रतिध्वनी तयार होतो म्हणूनच हे ठिकाण मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. इथून माथेरानच्या उंच कड्यांचे, खोल दऱ्यांचे आणि दाट जंगलांचे विहंगम दृष्य दिसते, जे निसर्गप्रेमींना पर्वणीसारखे वाटते.
  • वन ट्री हिल पॉईंट
    हे ठिकाण एका उंच टेकडीवर एकट्याच उभ्या असलेल्या झाडामुळे प्रसिद्ध आहे. इथे पोहोचण्यासाठीचा ट्रेक हा साहसप्रेमींसाठी खास आकर्षण आहे, कारण वाटेत खडकाळ रस्ते आणि हिरवीगार झाडी असते. एकदा शिखरावर पोहोचलात की, खोल दऱ्या आणि लांबवर पसरलेली पर्वतरांगांची अप्रतिम दृष्ये मन मोहून टाकतात.
  • अलेक्झांडर पॉईंट
    हे शांत आणि निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. इथून पालसदरी तलाव, कर्जत आणि बोरगाव ही गावे स्पष्ट दिसतात. प्रदूषणमुक्त हवा आणि मनाला उल्हसित करणारे वातावरण यामुळे इथे येऊन काही वेळ शांततेत घालवणे हा एक सुखद अनुभव असतो. याशिवाय, येथे घोडेस्वारी आणि लहानश्या पायी फेरीसाठी उत्तम जागा आहे.
  • मंकी पॉईंट
    इथल्या लहानशा खट्याळ माकडांमुळे या पॉईंटला मंकी पॉईंट असे नाव पडले आहे! पर्यटकांच्या खाण्याच्या वस्तूंवर यांचे खास लक्ष असते, त्यामुळे जपून राहावे. याशिवाय, इथून खोल दऱ्या आणि हिरव्यागार पर्वतरांगा यांचे विलोभनीय दृष्य पाहता येते, त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.
  • प्रबळगड किल्ला
    प्रबळगड हा माथेरानच्या जवळ प्रबळ पर्वतावर वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इतिहासप्रेमी आणि साहसशौकिनांसाठी एक उत्तम ट्रेकिंग ठिकाण आहे. किल्ल्यावर प्राचीन अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि निसर्गरम्य दृष्ये पाहायला मिळतात. ट्रेकिंगचा मार्ग मध्यम कठीण असला तरी, पावसाळ्यानंतर हिरवाईमुळे हा प्रवास अत्यंत रम्य होतो.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

माथेरान हे वर्षभर मोहक भासणारे ठिकाण आहे, कारण प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे सौंदर्य वेगळ्या प्रकारे खुलते. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण माथेरान धुक्याच्या दुलईत लपेटलेले असते. सभोवतालची हिरवाई अधिकच ताजीतवानी दिसते आणि धबधबे आपल्या पूर्ण प्रवाहानी वाहू लागतात. या काळात निसर्गप्रेमींसाठी माथेरान म्हणजे जणू स्वर्गच असतो. हिवाळ्यात (ऑक्टोबर ते फेब्रुवारी), येथील थंडगार आणि आल्हाददायक हवामान ट्रेकिंग, निसर्गसौंदर्य पाहणे आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीजसाठी अतिशय उत्तम ठरते. या महिन्यांत माथेरानचे शांत आणि निर्मळ वातावरण अधिकच सुंदर भासते, त्यामुळे येथे वेळ घालवण्याचा आनंद द्विगुणित होतो. उन्हाळ्यात (मार्च ते मे), इथले हवामान बाकी शहरांच्या तुलनेने थंड आणि प्रसन्न असल्याने उन्हाच्या झळांपासून दूर राहण्यासाठी माथेरान हा एक सर्वोत्तम पर्याय ठरतो. उन्हाळ्यातही येथे निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवता येतो. कोणताही ऋतू असो, माथेरानच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचा आणि शांततेचा अनुभव नेहमीच अद्वितीय असतो!

माथेरानला कसे पोहोचाल?

माथेरान हे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून सहज पोहोचता येणारे ठिकाण आहे. रस्त्याने प्रवास करताना, मुंबईपासून साधारण ९० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर असलेले माथेरान उत्तम महामार्गांनी जोडलेले आहे. मात्र, माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे पर्यटकांना आपली गाडी, दस्तुरी नाका येथे पार्क करून पुढील प्रवास घोड्यावर, हातरिक्षाने किंवा पायी करावा लागतो. दस्तुरी नाका हा माथेरानमध्ये वाहनाने पोहोचता येणारा शेवटचा पॉईंट आहे.

रेल्वेने प्रवास करण्याचा विचार असेल, तर नेरळ हे माथेरानसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मुंबई आणि पुण्याशी उत्तम जोडलेले आहे. नेरळहून माथेरानला जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत—टॅक्सीने दस्तुरी नाक्यापर्यंत जाणे किंवा माथेरानच्या प्रसिद्ध टॉय ट्रेनने प्रवास करणे. टॉय ट्रेन हा पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे, कारण हा प्रवास घनदाट जंगल आणि डोंगररांगा यामधून जातो आणि एक वेगळाच अनुभव देतो.

हवाई मार्गाने प्रवास करत असाल, तर सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) आहे, जे सुमारे १०० किमी अंतरावर आहे. विमानतळावरून टॅक्सीने नेरळपर्यंत आणि पुढे माथेरानला जाता येते. माथेरानमध्ये पोहोचण्याचा प्रवास जितका सहज, तितकाच निसर्गसंपन्न आणि अनोखा आहे!

सावधगिरी आणि सूचना

माथेरान हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग असून, येथे प्रवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात येणार असाल, तर हवामानाची विशेष काळजी घ्या. माथेरानमध्ये पावसाळ्यात दमट हवामान असते आणि दाट धुके पसरते, त्यामुळे रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच, रस्ते आणि ट्रेकिंग ट्रेल्स निसरडे होतात, त्यामुळे मजबूत ट्रेकिंग बूट घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ट्रेकिंग किंवा मोठ्या अंतरावर चालत फिरण्याचा विचार करत असाल, तर पाण्याची बाटली, हलके खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचाराचा छोटा किट सोबत ठेवावा. माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी नाही, त्यामुळे दस्तुरी नाक्यापासून पुढील प्रवास तुम्हाला पायी, घोड्यावर किंवा हात रिक्षाने करावा लागतो. त्यामुळे आरामदायी कपडे आणि बूट घालावेत, जेणेकरून या पायी प्रवासात थकवा जाणवणार नाही. येथे राहण्याची उत्तम सोय आहे, पण पीक सिझन मध्ये आगाऊ बुकिंग केल्यास प्रवास अधिक सोयीस्कर ठरेल.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी जबाबदार पर्यटन करणे अत्यंत आवश्यक आहे. माथेरान हे भारतातील प्रदूषणमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते, त्यामुळे कचरा टाकू नका, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा आणि निसर्गाचा आदर राखा. या साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा माथेरानचा प्रवास अधिक आनंददायक आणि संस्मरणीय ठरेल!

माथेरानला का भेट द्यावी?

माथेरान म्हणजे निसर्गसौंदर्य, शांतता आणि साहस यांचे परिपूर्ण मिश्रण! तुम्हाला निवांत सुट्टी हवी असेल, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, किंवा साहसी ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल – येथे सगळ्यांसाठी काहीतरी खास आहे. प्रदूषणमुक्त हवा, समृद्ध जैवविविधता आणि मनमोहक नजारे यामुळे माथेरान महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि मोहक ठिकाणांपैकी एक आहे. आठवड्याच्या शेवटी लहानसा ब्रेक घ्यायचा असो किंवा मनसोक्त सुट्टी एन्जॉय करायची असो – माथेरान तुम्हाला नेहमीच प्रसन्न अनुभव देईल!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

Ideal Duration

Best Time

Planning a Trip?

http://mahabooking.com/

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

How to Reach

By Air

Mumbai – 91 km, Pune – 125 km

By Train

Neral – 20 km, CSMT – 82 km, Pune – 113 km

By Road

Mumbai – 88 km